Vbl

Monday 3 October 2016

परमेश्वर

तिथे तो परमेश्वर जिवंत आहे

जिथे धर्म सत्य दोन्ही नांदत आहे
जिथे ईमानदारी अजुन जिवंत आहे
असा योगायोगाचा जिथे दृष्टांत आहे
तिथे तो अनादी अनंत आहे

जो ताटातला घास भुकेल्याला देतो
आपला आनंद सर्वान्मधे वाटतो
जो दुसर्यंच्या चेहर्यावर हास्य फुलवतो
स्वताचे दुख मात्र काळजात लपवतो

अश्या मनात जिथे माणुसकी आहे
दुसर्या बद्दल जिथे आपुलकी आहे
जिथे प्रेम असे हे आसमंत आहे
तिथे तो परमेश्वर जिवंत आहे
तिथे तो परमेश्वर जिवंत आहे

गर्भ

सूर्य आला डोईवरी
त्यात किरणे अंगारली
भेग ती मातीला पडता
भेग पडती मनाला
भेगेतून भेग वाढे
तोडे त्या मनांना II

हरवता ते नदी नाले
क्षितिजसुद्धा हरवले
रुक्ष ते वेली अन वृक्ष
आकाश पण पांढरले II

घेतला तू घोट गर्भी
करुनि केशवपन या भू चे
सती झाली माय माझी
सोवळे ती ल्यायली II

कसली इच्छा अन आकांक्षा
हर ऋतू तू इच्छितो
तिन्ही पोरे दान तुजला
तू स्वतःला पूजितो II

काय ऊन ? अन काय पाऊस ?
थंडीत तरी काय ते ?
तूच केले नष्ट सर्व
दोष भू ला द्यायचे II

उभे डोंगर दऱ्या खोरे
पोखरून तू काढले
तूच ज्ञानी या जगी
पुढील पिढीस नाडले II

Wednesday 13 May 2015

मानवता

जगाच्‍या मोहपाशातून विरक्त होऊन एक संत आपल्‍या कुटीत ईश्‍वराचे चिंतन करत कंदमुळे खाऊन आनंदात जगत होते. ते कुणालाही भेटत नसत किंवा त्‍यांच्‍याकडेही कुणी येत जात नसे. एके दिवशी संत खूप आजारी पडले लोकांनी त्‍यांच्‍यावर बरेच उपचार केले परंतु यश आले नाही. अखेरीस संतांनी देह ठेवला. मृत्‍यूनंतर ते जेव्‍हा स्‍वर्गात पोहोचले तेव्‍हा त्‍यांना सोन्‍याचा मुकुट घालण्‍यात आला. तसेच तेथे दुसरेही एक संत आले होते त्‍यांच्‍या डोक्‍यावर हिरेजडीत मुकुट होता. हे पाहून सोन्‍याचा मुकुट घालणा-या संताना खूप दु:ख झाले. त्‍यांनी देवदूताला विचारले की, मी संतत्‍वात कोणत्‍याच दृष्‍टीकोनातून कमी नाही तरीही मला सोन्‍याचा मुकुट व त्‍या संतांना हि-याचा मुकुट असा भेदभाव का? असा भेदभाव स्‍वर्गात तरी अभिप्रेत नाही. त्‍यांचे बोलून झाल्‍यावर देवदूत म्‍हणाला,’’ तुम्‍ही पृथ्‍वीवर हिरे माणके दिलेली नव्‍हती तेव्‍हा तुम्‍हाला इथे ती कुठून मिळतील?’’ संतांनी विचारले,’’त्‍या संतानी दिली होती काय?’’ देवदूताने होय असे उत्तर दिले. देवदूत पुढे म्‍हणाला,’’वास्तवात हिरे-माणकं म्‍हणजे अश्रू होते. जे त्‍यांनी संसार करताना गाळले होते. जगात घडणा-या प्रत्‍येक वाईट गोष्‍टीबद्दल त्‍यांना वाईट वाटले व त्‍याबद्दल त्‍यांच्‍या डोळ्यातून अश्रू ढळले होते. मात्र तुम्‍ही एक टिपूसही गाळला नाही.’’ संत म्‍हणाले,’’ मी कशाला अश्रू गाळू? मी तर ईश्‍वरभक्ती आणि स्‍नेह यातच खूप आनंदी होतो म्‍हणून मला कधी दु:ख जाणवलेच नाही.’’ देवदूत म्‍हणाला,’’ तुम्‍हाला ईश्‍वराचा स्‍नेह मिळाला म्‍हणूनच तुम्‍हाला ईश्‍वराचा सोन्‍याचा मुकुट देण्‍यात आला आहे.’’संताना स्‍वत:ची चुक समजली. ते स्‍वत:मध्‍येच मशगुल राहिले. त्‍यांना सभोवतालचे दु:ख कधीच दिसले नाही


तात्‍पर्य:-ईश्‍वरभक्तीबरोबरच दु:खात इतरांना मदत करणे हीच मानवता होय.

सोन्‍याची कुदळ

एका माणसाला दोन मुले होती जेव्‍हा तो म्‍हातारा झाला. तेव्‍हा त्‍याने आपल्‍या दोन्‍ही मुलांना बोलावले आणि म्‍हटले,' आता माझे वय झाले आहे, देवाचे कधी मला बोलावणे येईल आणि मरण्‍यापूर्वी मी तुम्‍हाला काही सांगू इच्छितो. पैसा हा भांडणाचे मूळ आहे. त्‍यामुळे मी माझ्यासमोरच पैशाची विभागणी करू इच्छितो, माझ्याकडे एक करामती कुदळ आहे. तिला जितके चालवाल तितके सोने ती उकरते. एकीकडे ही कुदळ आहे आणि दुसरीकडे सारे धन-संपत्ती, तुम्‍ही सांगा की कोण काय घेणार? मोठ्या मुलाने विचार केली की कुदळीला कोणी चोरले तर आपल्‍याकडे काहीच राहणार नाही. त्‍यामुळे धन-संपत्ती घ्‍यायला पाहिजे. लहान मुलाने विचार केला की नेहमीच सोने उकरणारी कुदळ घ्‍यायला पाहिजे. अशाप्रकारे मोठ्या मुलाने धनसंपत्ती आणि छोट्या मुलाने कुदळ घेतली. वडील हरिद्वारला निघून गेले. त्‍यांचे नियंत्रण सरकताच मोठ्या मुलाने पैसा पाण्‍यासारखा पैसा खर्च करायला सुरुवात केली आणि काही काळानंतरच तो गरीब झाला. इकडे लहानमुलाने शेतात जाऊन कुदळ चालवणे सुरु केले परंतू त्‍यातून मातीच निघाली. सोने नाही, तो हैराण झाला की वडिलांनी आपल्‍याला खोटे का सांगितले?मग त्‍याच्‍या आत्‍म्याने म्‍हटले,'' नाही, वडील खोटे बोलू शकत नाहीत. एक दिवस कुदळ सोने अवश्‍य देईल आणि आपण श्रीमंत होऊ.'' असा विचार करून तो दररोज शेतात कुदळ चालवायचा. त्‍याने शेतात पिकाची पेरणी केली आणि भरघोस पीक आले. गावात सर्वात जास्‍त पीक त्‍याच्‍या शेतात आले होते. अशा प्रकारे कुदळीने वास्‍तवात सोने दिले होते आणि तो श्रीमंत झाला.


तात्‍पर्य :- संपन्नतेची खरी चावी परिश्रमात आहे. जो परिश्रम करीत असतो त्‍याच्‍या घरी समृद्धी, सुख अवश्‍य येते.

योग्य उपाय

आचार्य विनोबा भावे यांना भेटायला एक महिला आली. ती म्‍हणाली,'' मी दु:खी आहे. माझा पती दारुडा आहे. रोज दारू पिऊन मला अपशब्‍द बोलत असतो आणि कधी-कधी मारहाणही करतो. माझे जीवन त्‍याने नरकासमान बनवले आहे.'' विनोबांनी तिला विचारले,''तो जेव्‍हा दारू पितो तेव्‍हा तू काय करत असतेस?'' ती म्‍हणाली,'तेव्‍हा मला त्‍याचा खूप राग येतो. पहिल्‍यांदा मी त्‍याला फार वाईट बोलायची, परंतु त्‍याच्‍यावर कसलाही परिणाम होत नाही हे पाहून मी आता उपवास करणे सुरु केल आहे.'' विनोबांनी प्रश्‍न केला,''उपवासात खाणे-पिणे सर्व सोडून देतेस का?'' महिला म्‍हणाली,''नाही, फळे खात असते.'' तेव्‍हा विनोबांनी म्‍हटले,'' मग तर तुझा पती आणखीनच नाराज होत असेल, कारण की तुझ्या फळे खाण्‍यामुळे घरखर्चात वाढ होत असेल.'' हे ऐकताच महिला रडू लागली तेव्‍हा विनोबा म्‍हणाले,'' रागाने किंवा जेवण सोडून दिल्‍याने कुणालाही चुकीच्‍या मार्गावरून हटवले जाऊ श्‍कत नाही. प्रेम तेच असते, जे आपल्‍यात निर्माण होते. मनात दुर्भावना असेल आणि प्रेमाचा देखावा केला तर त्‍याचा प्रभाव उलट होतो.'' महिला म्‍हणाली,''मी काय करु? त्‍याला दारुच्‍या नशेत पाहून माझा माझ्यावर ताबा राहत नाही.'' विनोबांनी समजावले,'' हेच तर चुकीचे आहे, तू आपल्‍या पतीला वाईट मार्गापासून तेव्‍हाच रोखू शकशील, जेव्‍हा तू वाईट गोष्‍टींना समजून घेशील. त्‍याचा पहिल्‍यांदा प्रयत्‍न कर.'' महिलेच्‍या लक्षात आपली चूक आली की, क्रोधाने क्रोधाला जिंकले जाऊ शकत नाही. त्‍यावर प्रेमानेच विजय मिळविता येऊ शकतो हाच मार्ग मिळाल्‍याचा आनंद तिच्‍या चेह-यावर दिसू लागला.



तात्‍पर्य :- वाईट व्यक्तीची घृणा करत बसण्‍यापेक्षा वाईट वृत्ती कमी करण्‍यासाठी प्रयत्‍न केले पाहिजेत आणि हे कार्य दृढ इच्‍छा‍शक्तीनेच शक्‍य आहे.

सखोल अभ्यास

खूप वर्षापूर्वीची गोष्‍ट आहे. भारतावर इंग्रजांचे राज्‍य होते. माणसांनी खच्‍चून भरलेली एक रेल्‍वे प्रवास करत होती. प्रवाशांमध्‍ये जास्‍तीत जास्‍त भरणा हा इंग्रजांचाच होता. एका डब्‍यात एक भारतीय गंभीर चेहरा करून बसलेला होता. सावळ्या रंगाचा, मध्‍यम उंचीचा हा मनुष्‍य साधारणप्रतीचे कपडे घालून प्रवास करत होता. त्‍याच्‍या रंगाकडे आणि एकूणच अवताराकडे बघून डब्‍यातील बहुतांश इंग्रज त्‍याची चेष्‍टामस्‍करी करत होते. त्‍याला खेडूत, अडाणी समजून त्‍याच्‍या अवताराची ते टिंगल करत होते. पण त्‍यांच्‍या त्‍या चेष्‍टामस्‍करीकडे, टिंगल करण्‍याकडे त्‍या भारतीयाचे लक्ष नव्‍हते. तो त्‍याच्‍या नादात मग्‍न होता. अचानक तो भारतीय उठला आणि त्‍याने रेल्‍वेची साखळी ओढली. वेगात धावणारी ती आगगाडी तात्‍काळ थांबली. गाडीतले प्रवासी त्‍याला काहीबाही बोलू लागले. थोड्याच वेळात गार्डही तेथे आला व त्‍याने विचारले,’’ कोणी साखळी ओढून ही रेल्‍वे थांबविली’’ त्‍या सावऴया रंगाच्‍या व्‍यक्तिने उत्तर दिले,’’मी ओढली साखळी, मी थांबवली रेल्‍वे’’ गार्डने या कृतीचे कारण विचारले असता ती व्‍यक्ति उत्‍तरली,’’माझ्या अंदाजानुसार इथून काही अंतरावर रेल्‍वे पट्ट्या खराब झाल्‍या आहेत.’’ गार्डने विचारले,’’ हे तुला कसे कळले’’ ती व्‍यक्ति म्‍हणाली,’’ माझ्या अनुभवानुसार रेल्‍वेच्‍या गतीमध्‍ये काही फरक पडला आहे आणि त्‍यामुळे रेल्‍वेचा जो विशिष्‍ट आवाज येतो तो न येता आवाज न येता वेगळा आवाज येऊ लागला आहे. असा आवाज फक्त रेल्‍वे पट्ट्या खराब असतानाच येतो हे माझे गणित आहे. आपण याची खात्री करून बघू शकता.’’  गार्डने याची खातरजमा करून बघण्‍यासाठी त्‍या व्‍यक्तिला बरोबर घेतले व पुढे जाऊन पाहतात तो काय, एका ठिकाणी खरोखरीच रूळाच्‍या पट्ट्या निसटून रूळ सटकले होते. तेथील नटबोल्‍टही तेथूनच बाहेर पडलेले दिसून येत होते. हे सर्व होत असतानाच रेल्‍वेत त्‍या माणसाची टिंगल करणारे प्रवासीही तेथे येऊन पोहोचले व हे सर्व पाहून ते आश्‍चर्यचकित झाले. केवळ त्‍या माणसाच्‍या ज्ञानामुळे आज त्‍यांचे प्राण वाचले होते हे जाणवून ते सर्व आता त्‍या माणसाची प्रशंसा व स्‍तुती करू लागले. गार्डने त्‍यांचे आभार मानले व विचारले,’’ सर, मी तुमचे नाव व हुद्दा जाणू शकतो काय’’ त्‍या माणसाने शांतपणे उत्तर दिले,’’ माझे नाव डॉ.एम. विश्र्वेश्‍वरैय्या असून मी व्‍यवसायाने इंजिनियर आहे.’’ त्‍यांचे नाव ऐकताच सगळेचजण स्‍तब्‍ध झाले. कारण त्‍याकाळात विश्र्वेश्‍वरैय्या यांना संपूर्ण देश एक हुशार इंजिनिअर म्‍हणून ओळखत होता. टिंगल करणा-या लोकांनी त्‍यांची क्षमा मागितली.

महत्‍व आईचे

एकदा एका व्‍यक्तीने स्‍वामी विवेकानंदांना प्रश्‍न विचारला,'' स्‍वामीजी, संसारामध्‍ये जेवढी आईची महती गायली जाते तेवढे महत्व पित्‍याला का दिले जात नाही?मातेइतकाच पितासुद्धा महत्‍वाचा असूनसुद्धा पित्‍याला फारसे का महत्‍व दिले जात नाही याचा कृपया उलगडा करावा.'' स्‍वामीजी यावर काहीच बोलले नाही. ते त्‍या व्‍यक्तिपासून थोडे दूर गेले आणि एक मोठा दगड त्‍यांनी उचलला व त्‍या व्‍यक्तिच्‍या हाती देत ते म्‍हणाले,'' बंधू, हा दगड उद्या सकाळपासून तू पोटाला बांध आणि तुझी नित्‍यनेमाची सर्व कामे करत जा. तुझ्या प्रश्‍नाचे उत्तर तुला मिळून जाईल.'' दुस-या दिवशी सकाळी ओरडतच तो माणूस स्‍वामी विवेकानंदांकडे आला,'' स्‍वामीजी माझी कंबर, पोट दोन्‍हीही खूप दुखत आहे. एक प्रश्‍न काय विचारला मी, तुम्‍ही असे काय विचित्र उत्तर दिले त्‍याचे. माझी कंबर, पोट अगदी दुखून मी हैराण झालो आहे.'' स्‍वामी मंद स्मित करत म्‍हणाले,'' बंधू, तुझ्या प्रश्‍नाचे उत्तर तुला मिळाले नाही काय? अरे जिने नऊ महिने तुला पोटात घेऊन तुला वाढवले, तुझे कधीही तिला ओझे झाले नाही, तिने कधीही कंटाळा केला नाही. त्‍या मातेची महती ही तिन्‍ही लोकांत सर्वश्रेष्‍ठच आहे. ''



तात्‍पर्य :- आईसारखे दैवत सा-या जगतामध्‍ये नाही.